माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे!
माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे!
कोकणातील तीन पाटबंधारे योजनांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन.
मुंबई, दि. 6 मार्च:
कोरोना राक्षस नष्ट करून माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना भराडी देवीच्या चरणी करून , माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी देवीकडे मागितला.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापूरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग या योजनांचे ऑनलाईन भुमीपुजन करण्यात आले.
कार्यक्रमास सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक राज्यमंत्री मृद व जलसंधारण खासदार सर्वश्री विनायक राऊत, अरविंद सावंत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,
इतकी वर्षे या जत्रेबद्दल मी ऐकत होतो, गेल्यावर्षी तिथे मुख्यमंत्री म्हणून तिथे येता आलं याचे खुप समाधान आहे. यावेळी कोरोनामुळे आभासीपद्धतीने तुमच्याशी बोलत आहे. आभासी शब्द मला आवडत नाही.पण पर्याय नाही. आज जरी मी तिथे तुमच्यात प्रत्यक्ष नसलो तरी मनाने मी तिथेच आहे. गेल्यावर्षीचे भक्तांनी फुलून गेलेले मंदिर आठवते. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्षे मार्गी न लागलेल्या तीन योजना आज मार्गी लागत आहेत याचा निश्चित आनंद आहे.
कोविड काळात आपण काम करत आहोत. अनेकजण भराडी देवीच्या उत्सवाची वाट पहात आहेत. मला माहित आहे आज आपण सगळेजण एकत्र येऊन कोरोना नामक संकटाचा मुकाबला करतो आहोत. आपण सगळे सहकार्य करत आहेत म्हणून कारोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत
कोकणात पाऊस भरपूर पडतो, पुर येतो, अतिवृष्टी होते पण ते संपल्यानंतर सगळं पाणी वाहून समुद्राला मिळते. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरड जाते मग अनेक खलबत होतात, योजना पुढे येतात. पण अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. या तीन पाटबंधारे कामांचे आपण भुमीपुजन ऑनलाईन करतो आहोत पण धरणाच्या उदघाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे.
अनेकजण स्वत:साठी काही ना काही मागत असतात पण मला आनंद आहे की कोकणातील माझे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत, स्वत:साठी काही न मागता जनतेसाठी हॉस्पीटल आणि इतर गोष्टी मागत आहेत. रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सुरु आहे.
संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे, निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधी लपवलेले नाही म्हणूनच मी गेल्यावर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो तेंव्हा आपण सगळ्यांनी मिळून कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असतांना कोरोना आला आणि सगळं ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
