अनाथ बांधवांनी देशाचा नाथ होण्याचे स्वप्न पहावे!
अनाथ बांधवांनी देशाचा नाथ होण्याचे स्वप्न पहावे..बच्चू कडू…
अनाथ पंधरवडा सांगता समारंभ संपन्न…
मुंबई, दि. 10 फेब्रुवारी :
अनाथ बांधवांनी आपण अनाथ नाही तर या देशाचा नाथ होणार हे स्वप्न पहावे; त्याची पूर्तीही होऊ शकेल, असा प्रोत्साहनपर असा संदेश महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अनाथ बालकांना दिला.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित अनाथ पंधरवडा सांगता समारंभात राज्यमंत्री कडू बोलत होते. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, दीपस्तंभ फौंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
अपंग, अनाथ, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये ठळक स्थान असायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन बच्चू कडू म्हणाले की, अनाथांना शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतल्याने त्यांच्या जीवनात पहाट येणार आहे. अर्थात त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. यापुढील काळातही राज्य शासनाकडून अनाथांना न्याय मिळेल अशा प्रकारे काम केले जाईल, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री कडू पुढे म्हणाले की, बालगृहातून बाहेर पडल्यानंतर अनाथ बालकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी अकोला जिल्ह्यात पथदर्शी स्वरुपात सर्व अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनातून घरकुल देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अनाथ मुलांना संजय गांधी निराधार योजनेतून 1 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येत आहे, असेही कडू म्हणाले.
आयुक्त डॉ. यशोद यांनी माहिती दिली की, अनाथ प्रमाणपत्रासाठी 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत 402 अर्ज प्रलंबित होते. तथापि, पंधरवड्याची विशेष मोहीम हाती घेतल्याने 1 हजार 334 नवीन अर्ज प्राप्त झाले. त्यामधून पंधरा दिवसात 204 तर आतापर्यंत एकूण 499 प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. उर्वरित प्रमाणपत्रे वितरीत करण्यासाठी गतीने कार्यवाही सुरु आहे. आतापर्यंत संस्थेतील बालकांनाच अनाथ प्रमाणपत्र देण्यात येतात. यापुढील काळात संस्थाबाह्य अनाथ बालकांनाही प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत प्रस्ताव करण्यात येणार आहे, असेही डॉ. यशोद म्हणाले.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत व्यवस्था…
यजुवेंद्र महाजन यांनी दीपस्तंभ फौंडेशनतर्फे जितकेही अनाथ बालके प्रशिक्षणासाठी इच्छुक असतील त्यांना भारतीय प्रशासकीय आणि पोलीस सेवाच्या परीक्षेसाठी मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येईल अशी घोषणा केली. आतापर्यंत फौंडेशनतर्फे देशभरातील 81 अनाथ आणि 450 अपंग मुलांना स्पर्धापरीक्षांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जळगाव, पुणे आणि मुंबईमध्ये ही प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात मुंबईतील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच उच्च शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आदी क्षेत्रात विशेष प्राविण्य आणि कामगिरी केलेल्या अनाथ युवक युवतींचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
