कोरोनाच्या संकटात, ‘शिवभोजन’ची साथ!

0
ShivBhojan

मुंबई, दिनांक ३० जून २०२०

गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू केली असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचा गरजूंनी लाभ घेतला आहे. या थाळीने राज्यातील गरीब, गरजूंना मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुका स्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.

अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतुक केले आहे.

शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *