शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आता पुण्यात!
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आता पुण्यात !
पुणे, दि. 10 जानेवारी:
स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आधारवड दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या मदत कक्ष आता पुण्यात सुरू करण्यात आला आहे. सदाशिव पेठ येथील शाखेचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
या कक्षाच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वैद्यकीय मदतीकरिता सरकारी योजनांचा लाभ मिळेल तसेच रूग्णालयाच्या बिलात सवलत, महागड्या शस्त्रक्रिया मोफत अथवा सवलतीच्या दरात मिळतील, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात राज्यात कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व्यवस्था कमी पडू नये यासाठी अहोरात्र नि:स्वार्थीपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोविड योध्द्यांचे अभिनंदन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील कोविड योध्यांचा यावेळी सन्मान करुन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये दुर्गम भागातील गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत त्यांना त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे शहरप्रमुख राजाभाऊ भिलारे, वैद्यकीय मदत क्षेत्राच्या पुणे शाखेचे पदाधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
