‘मराठी नाय तर ॲमेझाॅन नाय’…मनसे आक्रमक!
‘मराठी नाय तर ॲमेझाॅन नाय’…मनसे आक्रमक !
राज ठाकरेंना कोर्टाची नोटीस येताच मनसेचे खळखट्याक.
मुंबई, दि. 25 डिसेंबर:
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झाली असून अॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या ॲपमध्ये मराठीचा पर्याय ठेवा अशी मागणी केल्यानंतर ॲमेझाॅनने कोर्टात धाव घेतली आणि कोर्टात राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्याने मनसेने आक्रमक होत अमेझाॅनच्या ऑफीसवर जाऊन खळ्ळं खट्याक केले. पुण्यातील अॅमेझॉनच्या ऑफीसची तोडफोड केल्यानंतर मुंबईतील ऑफीसवर महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड करून इशारा दिला. मुंबईत पवई, दहिसर, साकीनाका, चांदिवली परिसरातील ॲमेझॉनची कार्यालयं मनसे कार्यकर्त्यांनी फोडली.
‘नो मराठी, नो ॲमेझॉन’ अशा घोषणा देत पोस्टरही झळकावले. सोशल मीडियावर ‘बॅन अॅमेझॉन’ची मोहीमही सुरु करण्यात आली. ‘महाराष्ट्रात फक्त मराठी. इथून पुढे तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी’ असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.
मनसे नेते अखिल चित्रे म्हणाले, मराठीच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून अमेझाॅनला यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजू.
कोट्यवधी मराठी भाषिक ॲमेझॉन ॲपच्या माध्यमातून खरेदी करत असताना ॲमेझॉन या मागणीकडं दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
