सोलापूर/पंढरपूर, दि. २८ जून २०२०
आषाढीवारी निमित्त पंढरपूरमध्ये मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह अनेक मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराचे वेगळे माहात्म्य आहे, अख्यायिकाही आहेत, यापैकीच एक पुंडलिकाचे मंदिर….
या पुंडलिकाला संत परंपरेत विशेष स्थान आहे. संत एकनाथ पुंडलिकाबद्दल एका अभंगात म्हणतात…
“धन्य धन्य दक्षिण भाग! जेथे उभा पांडुरंग !!
मध्ये शोभे पुंडलिक ! सनमुख चांग भीमारथी !! ”
तर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात….
पुंडलिकाच्या भावार्थ, गोखुळीहून आला येथ!
भक्त पुंडलिकाचे नाव घेतल्याशिवाय पंढरपूरचा महिमा पुर्ण होत नाही. विठ्ठलाच्या नावामागे, ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ! ..असा जयघोष असतो.
असा हा भक्त पुंडलिकाचा महिमा. वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी धारणा आहे. या पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागा नदीपात्रात असून इतर सर्व मंदिरापेक्षा या मंदिराचे शिखर सर्वात उंच आहे. पुंडलिकाचे हे मंदिर प्राचिन असून ते चांगदेवाने बांधले असे सांगितले जाते. मंदिरामध्ये मोठा सभामंडप असून आतील बाजूस गाभारा आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या मंदिरात पूजा व नित्योपचार केले जातात तर महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो.
पंढरपुरात विठोबा कसा आला, याबद्दल ज्या अख्यायिका आहेत त्यातील ही एक कथा…
पुंडलीक हा आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी पंढरपुरला आला होता. आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी स्वतः विठ्ठल प्रकटल्याचे आपण ऐकलेले आहेच. भक्त पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पाहून देव प्रसन्न झाले आणि पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपुरला आले परंतु पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करत आहे तोपर्यंत या वीटेवर थांब’ असे देवाला सांगून एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव करकटेवरी ठेवून उभा राहिला, अशी कथा सांगितली जाते.
संतांसाठी पुंडलिकाचे महात्म्य किती आहे हे काही अभंगातून दिसते…
सकळ संतांचा मुगुटमणी देखा|
पुंडलिक सखा आहे जेथे ||
भक्त पुंडलिकाने साक्षात विठ्ठलाला पंढरपुरात आणले म्हणून त्या भक्त पुंडलिकाला मुगुटमणी असे संत चोखोबा म्हणतात..आणि वारीसाठी पंढरपुरात जमलेल्या भक्ताचा मेळा पाहून संत म्हणतात…
‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा’..असा हा भक्त पुंडलिकाचा महिमा..
पंढरपुरला कधी गेलाच तर विठोबाचे दर्शन घेण्याआधी साक्षात विष्णुचा अवतार असलेल्या या भगवंताला विटेवर उभा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचे दर्शन आवर्जून करा…
बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम…पुंडलिक महाराज की जय.

अतिसुंदर धनंजय साहेब
केवळ पत्रकार नाही तर संतसाहित्याचेही आपण अभ्यासक आहात हे स्पष्ट झाले . भारतीय संतसाहित्य हे ज्ञानाचा फार मोठा खजाना आहे असेच लिहित रहा वाचनाने आम्हांलाही याची गोडी निर्माण होईल
धन्यवाद