रा. स्व. संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन !
रा. स्व. संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन.
वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नागपूर, दि. 19 डिसेंबर:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा. गो. वैैद्य यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी सकाळी ९.३० वाजता निघणार आहे. अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले धनंजय, डॉ. मनमोहन, श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम असा आप्त परिवार आहे.
मा. गो. वैद्य यांनी १९६६ पासून पत्रकारिता सुरु केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले.
मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.
माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. ते शतायुषी होतील हा ठाम विश्वास होता परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, अशी श्रद्धांजली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहिली आहे .
