कमलनाथ सरकार पाडण्यात मोदींचाच हात!
कमलनाथ सरकार पाडण्यात मोदींचाच हात.
भाजपाच्या वरिष्ट नेत्याचा गौप्यस्फोट
इंदोर, दि. १७ डिसेंबर :
विरोधी पक्षांच्या आमदारांना आमिष दाखवून फोडायचे आणि सरकार पाडायचे उद्योग भाजपाने मागील सहा वर्षात अनेकदा केले आहेत. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असतानाही अवघ्या १५ महिन्यात हे सरकार पाडण्यात आले. काँग्रेसमधील ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या गट फुटून भाजपाबरोबर गेला आणि भाजपाचे सरकार आले. हे सरकार पाडण्यात भाजपाचा हात होता असा आरोप त्यावेळी केला गेला पण आता हे सरकार पडावे यात कोणाची महत्वाची भूमिका होती हे भाजपाच्याच एका नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी इंदोरमध्ये एका जाहीर सभेत कमलनाथ सरकारबदद्ल एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, ‘मार्च २०२० मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती’
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं काँग्रेस सरकार पाडण्याचा निर्णय केला आहे, असे जून महिन्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पक्ष कार्यकर्त्यांना म्हटले होते. मार्च महिन्यात कोरोना लॉकडाऊन सुरू होण्याआधीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसोबत काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपाच्या गोटात गेले. त्यामुळे बहुमत नसल्याने कमलनाथ यांचे सरकार गेले आणि भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचे सरकार पुन्हा आले.
