अहमद पटेल दंतकथा म्हणून कायम चर्चेत राहतील!

0
IMG-20201214-WA0059

अहमद पटेलांच्या जाण्याने एक युग संपले; दंतकथा म्हणून ते कायम चर्चेत राहतील !: बाळासाहेब थोरात.

स्व. अहमद पटेल यांना सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली.

मुंबई, दि. १४ डिसेंबर २०२०
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार,
राज्यसभा खासदार स्व. अहमद पटेल यांची सर्वपक्षीय शोकसभा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी अहमदभाईंच्या आठवणांनी उजाळा दिला.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार साकारण्यात स्व. अहमद पटेल यांची भूमिका महत्वाची होती. शेवटच्या क्षणात त्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हे सरकार स्थापन झाले. अहमदभाई यांची प्रचंड स्मरणक्षमता होती. देशांतील सर्व राज्यातील राजकीय नेत्यांची जाण, माहिती अहमदभाईंना होती. पडत्या काळात काँग्रेस पक्षाची उंची वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. विद्यमान पंतप्रधान नरेंद मोदी यांना आव्हान देण्याची ताकद त्यांच्यात होती. महाविकास आघाडीला ते कायम मार्गदर्शन करत आले. अहमद पटेल जाणे म्हणजे एक अध्याय संपला. दंतकथा म्हणून भाई कायम चर्चेत राहतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, १९९२ साली जनरल सेक्रेटरी म्हणून केंद्रीय राजकारणात लक्ष द्यायला सुरू केले. त्यावेळेस नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांच्यातील दुवा हे अहमद पटेल होते. सरकार निर्माण करणारा, सरकारला वाचवणारा महान नेता पटेल होते. अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेत मंत्री अमित देशमुख यांना आठवणी सांगताना कंठ दाटून आला. अहमद पटेल यांचे विलासराव देशमुख अत्यंत निकटवर्तीय संबंध होते. माझे वैयक्तिक मोठे खूप नुकसान झाले असे मी मानतो असे अमित देशमुख म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहमद पटेल यांचे अचानक दुख:द निधन सर्वांना धक्का देणारे आहे. देशांतल्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान होते. माझी त्यांच्याशी दोनवेळा भेट झाली होती, अतिशय साधेपणाने वागणे, बोलणे होते. ज्यांनी अनेक मंत्री सीएम बनवले पण ते स्वत: कधी मंत्री झाले नाहीत. पक्ष संघटन बांधणीकडे कायमच लक्ष दिले. अनेक पक्षात मंत्री होणारे असतात पण पाठीमागे राहत काम करणारे अहमदभाई सारखे कमी असतात.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री सतेज पाटील, सहप्रभारी आशिष दुआ, चरणजितसिंह सप्रा, सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरुवातीला भजनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर मान्यवरांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *