ठाकरे सरकार अहंकारी; सरकारचे निर्णय तुघलकी!

0
IMG_20201213_184738

महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी !

ठाकरे सरकार अहंकारी; सरकारचे निर्णय तुघलकी!

सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही म्हणून दोन दिवसाचे अधिवेशन.

मुंबई, दि. 13 डिसेंबर:
महाराष्ट्रात कुणीही सरकारच्या विरोधात बोललं की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचं असे प्रकार सुरु आहेत. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं. कुठल्या तरी प्रकरणात अडकवलं जातं आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीच लागू झाल्याचे वातावरण आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि कंगना रणौत प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निकाल हे दोन्ही निकाल सरकारला चपराक देणारे आहेत. गोस्वामी आणि कंगना यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही. मात्र ज्या प्रकारे कारवाई झाली आणि कोर्टाने या दोन्ही प्रकरणात जे ताशेरे ओढले त्यानंतर या सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. तरीही सरकार सुधारण्या ऐवजी सत्तेचा अहंकार दाखवत आहे. असं अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कुठेच चालत नाही.

सरकार विरोधात कोणताही संघर्ष करण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही.जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ. हे सरकार अहंकारी आहे या सरकारचे निर्णय तुघलकी आहेत. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच.

या सरकारला अधिवेशन घेणं निश्चितपणे शक्य होतं. काल शरद पवार यांचा जन्मदिवस झाला त्यावेळी मेळावे झाले ना? आम्हीही मेळावे घेतो आहोत. जर हे सगळं होऊ शकतं तर अधिवेशन एक किंवा दोन आठवडे का घेतलं जात नाही. या सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही त्यामुळे केवळ 2 दिवसांचे अधिवेशन घेण्यात येत आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. अनेक ठिकाणी कवडीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. या काळातही भ्रष्टाचार हा संताप आणणारा आहे. राज्यात 48 हजार मृत्यू झाले आहेत, सरकार मात्र स्वतः स्थिती हाताळणीचा दावा का करते, हे अनाकलनीय आहे.कोरोनाच्या काळात भ्रष्टाचार ज्यांनी कुणी केला असेल, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.

मराठा आरक्षणावरही सरकार अपयशी ठरले असून
सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळणे हे दुर्दैवी.आज ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्रीच प्रश्न उपस्थित करीत आहेत.समाजामध्ये भयाचे वातावरण, ते तत्काळ दूर करणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *