माजी मंत्री विष्णु सावरा यांचे निधन !
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचे निधन !
सावरांच्या निधनाने भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला!
मुंबई, 9 डिसेंबर:
माजी आदिवासी मंत्री व भाजप नेते विष्णू सावरा यांचे मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. विष्णू सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच आज सायंकाळी त्यांचे निधन झाले.
विष्णू सावरा तब्बल सहा वेळा विधानसभेवर निवडून आले होते. सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
