मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार.
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास कोर्टाचा नकार.
सुप्रीम कोर्टाचा महाविकास आघाडी सरकारला झटका
नवी दिल्ली. दि. ९ डिसेंबर:
सुप्रीम कोर्टाने आज महाविकास आघाडी सरकारला जोरदार झटका दिला. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठण्यास नकार दिला आहे. नोकर भरती थांबवण्यास आम्ही नकार दिलेला नाही मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे.
राज्य सरकारची बाजू मांडताना वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलेले आहे. त्यासाठी स्वतंत्र एसईबीसी वर्ग तयार करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारच मुंबई उच्च न्यायालयाने हा कायदा योग्य ठरवला होता.
केंद्र सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा प्रश्न सुद्धा न्यायालयाच्या अखत्यारीत आहे मात्र त्याला स्थगिती दिली नाही. मग केवळ याच आरक्षणाला स्थगिती का? असा युक्तीवादही करण्यात आला.
