महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?
शाळा सुरु करण्यावरून सरकारमध्ये गोंधळ.
मुंबई, दि. 21 नोव्हेंबर:
राज्यातील शाळा सुरू करण्यावरून सुरू असलेल्या गोंधळावर तीव्र नाराजीचे सुर उमटले आहेत. ठाकरे सरकारमध्येच एकवाक्यता नाही. कोरोनाचे पेशंट वाढत असताना शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आणि नंतर मुंबई परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश आला. शिक्षण मंत्र्यांनी स्थानिक प्रशासनावर जबाबदारी ढकलली. हा सावळा गोंधळ असून पालक, शिक्षक व राजकीय क्षेत्रातूनही ठाकरे सरकारवर तोफ डागली जात आहे.
शाळेसंदर्भातील सरकारच्या निर्णयाचा समाचार घेताना भाजपा नेते आमदार आशिष शेलार म्हणाले, शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच. पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत.
परीक्षा घेण्यावरुन संभ्रम. परीक्षा घेतल्या त्यात पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप. अॅडमिशवरुन गोंधळ. फी वाढीबाबत हतबलता. अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ. महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.
राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून राज्यातील सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जारी केला व नंतर शुक्रवारी मागे घेतला आणि शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनांवर टाकली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील प्रशासनांनी ३१ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरून गोंधळ निर्माण झाला. याच मुद्यावरून आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरले.
