लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलातून सवलत नाही!
ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे विज बिल सवलतीवरून यु टर्न!
मुंबई, दि. १७ नोव्हेंबर :
कोरोना काळात भरमसाठ विज बिल वसूल करणाऱ्या महावितरणने राज्यातील जनतेला आज पुन्हा मोठा शॉक दिला.वाढीव बिलातून सवलत देणार असल्याचे आश्वासन दिलेल्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यु टर्न घेतला. ही वाढीव वीज बिलं भरावी लागतील, असे त्यांनी स्पष्ट करुन आपणच दिलेला शब्द फिरवला.
महावितरणने दोनच दिवसापूर्वी वीज बीलं भरा असा आदेश काढला आहे. तीच री ऊर्जामंत्र्यांनी ओढली. लोकांच्या तक्रारींचे निवारण केले आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्नही केले, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. आता वीज बिल सवलतीचा विषय बंद झाला आहे असे म्हणत उर्जामंत्र्यांनी हात वर केले.
वाढीव व मनमानी वीज बिलांतून सवलत मिळावी यासाठी भाजपा, मनसेसह विविध पक्ष तसेच संघटनांनी आंदोलनंही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात बैठका घेऊन चाचपणी केली पण अखेर या सरकारने जनतेची घोर निराशाच केली.
