राजेंद्र दर्डांच्या ‘माझी भिंत’चे राजभवनवर प्रकाशन

0
IMG_20201110_101323

 

मुंबई, दि. 10 नोव्हेंबर :
माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबुक पेजवरील नोंदी, निरीक्षणे, स्फुट लेख व अभिप्राय यांचे संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,  सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,  जलसंपदामंत्री जयंत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजेंद्र दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सुंदर मराठी भाषेतून लिहिलेल्या आपल्या पुस्तकामध्ये राजेंद्र दर्डा यांनी अधूनमधून हिन्दी भाषेतील पंक्तींची चवदार फोडणी दिल्यामुळे ‘माझी भिंत’ पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे.

महाराष्ट्रात आठ शतकांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने भिंत चालविल्याचा उल्लेख आहे. समाजमाध्यमांच्या आजच्या युगात राजेंद्र दर्डा यांनी देखील आपली ‘आभासी भिंत’ यापुढेही सुरु ठेवावी.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र असून त्याचा चांगला वापर कसा होऊ शकतो याचे ‘माझी भिंत’ हे उदाहरण आहे.

कोरोना काळात लोकांमध्ये एक अदृश्य भिंत तयार झाली आहे. राजेंद्र दर्डा यांची ‘माझी भिंत’ ही अदृश्य भिंत तोडण्याचे व माणसे जोडण्याचे काम करीत आहे असे निरीक्षण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नोंदविले.

राजेंद्र दर्डा अतिशय हुशार व प्रश्नांची जाण असणाऱ्या सहकाऱ्यांपैकी असून ‘माझी भिंत’ हे जग न फिरलेल्‍यांना जगभ्रमंतीचा आनंद देणारे पुस्तक ठरेल, असे जयंत पाटील यांनी संगितले.

लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र दर्डा यांनी पुस्तकासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ व ‘दीपभव’ या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. देवेंद्र दर्डा यांनी आभार मानले तर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *