मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून नोकरभरती करा!
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर:
मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असल्याने पोलीस भरतीसह इतर नोकरभरती, एमपीएससीची परिक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरसकट नोकर भरती बंद करुन इतर समाजावर अन्याय केल्याची भावना वाढीस लागली आहे. एका समाजासाठी सर्व समाजाला वेठीस धरणे चुकीचे असून मराठा समाजाच्या १२ टक्के जागा राखीव ठेवून त्वरीत नोकरभरती करावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. यावर वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे, त्यांना वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको.
ओबीसी समाजासह इतर समाजातील तरुणांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. त्यातून नोकर भरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. एका समाजासाठी इतर सर्व समाजावर अन्याय नको. महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन दोन तीन दिवसांत निर्णय घ्यावा.
मराठा आरक्षणवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायालयाचा निर्णय कधी येईल माहीत नाही. न्यायालयाचा निकाल मराठा समाजाच्या हातात नाही आणि सरकारच्याही हातात नाही. हा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल पण नोकर भरतीचा निर्णय लवकरात लवकर घ्या. कोणत्याही गरीब मराठा तरुणावर अन्याय होऊ नये अशीच आमची भावना आहे.
नोकरीसाठी वयाची मर्यादा असते, तरुण मुले परिक्षांची तयारी करतात. सरकारकडे नोकरी मागणे हा त्यांचा अधिकार आहे. मराठा, इतर मागासवर्गीय अथवा कोणत्याही जातीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये. त्यामुळे मराठा समाजाच्या १२ टक्के जागा राखीव ठेवून इतर जागांवर नोकर भरती करावी अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
