गडकरी संतापले आणि झाप झाप झापले….
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर:
सरकारी कामात होणारा विलंब, प्रकल्प रखडण्याचे प्रकार हे नित्याचेच झाले आहेत. सरकार कोणाचेही असो प्रशासनातील काही बाबू मंडळी फारच सुस्तावलेली व बेफीर वृत्तीची आहेत याचा अनुभव सरकारमधील मंत्री व सामान्य जनता म्हणून आपल्यालाही अनेकदा आला आहे. हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प केवळ या सरकारी बाबूंच्या अडेलतट्टू पणामुळे पूर्णत्वास जात नाहीत तर काही प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळत पडतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धडाडीचे मंत्री, त्यांचा कामाचा उरक आणि वेग हा प्रचंड आहे. प्रशासनातील अडेलतट्टू, काम चुकार प्रवृत्तींना झोडपायला ते कधीच मागेपुढे पहात नाहीत. आताही तेच झाले.
केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे उद्धाटन नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी त्यांनी माहिती घेतली तेव्हा गडकरी चांगलेच संतापले. या इमारतीच्या उभारणीला झालेल्या प्रचंड विलंबाबद्दल गडकरींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना झाप झाप झापले.
गडकरी म्हणाले, कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचे अभिनंदन करण्याची प्रथा आहे पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? २००८ मध्ये ही इमारत उभारण्याचे निश्चित झाले, २०११ मध्ये निविदा निघाली आणि दोन-अडीचशे कोटींचे काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झाले. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झाले. ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केले त्यांचे फोटो या कार्यालयात लावायला हवेत,” असा टोमणा गडकरींनी मारला.
दिल्ली-मुंबई महामार्ग हा एक लाख कोटी रुपयांचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचे आपण अभिमानाने सांगत असतो आणि दोनशे कोटींच्या कामासाठी दहा वर्ष घालवली हे सांगायची मला लाज वाटत आहे. जे विकृत विचारांचे लोक आहेत, ज्यांनी १२ -१३ वर्षांपासून खूर्चीला चिकटून बसले आहेत हे नकारात्मक आणि विकृत आहे. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे याचे उदाहरण म्हणजे ही इमारत आहे, अशा विकृत लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, असेही गडकरींनी सुनावले.
