महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही!
सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले.
मुंबई, दि. १६ आक्टोबर:
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणारी याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावताना सु्प्रीम कोर्टाने तिघा याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना म्हणाले, ‘हा अधिकार राष्ट्रपतींचा आहे, तुम्ही राष्ट्रपतींकडे विचारणा करु शकता. तुम्ही करत असलेले सर्व उल्लेख मुंबईमधील असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही, तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?, अशा शब्दांत त्यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले.
दिल्लीतील वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांनी ही याचिका केली होती. याचिकाकर्त्यांकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख याचिकेत केला होता. सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने वागून लोकांवर दडपशाही करत असेल तर राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक ठरते, असे याचिकेत म्हटले होते. ‘संपूर्ण राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येत नसेल तर किमान मुंबई व लगतचे जिल्हे लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती.
