सरन्यायाधीशांवरील हल्ला लोकशाही व संविधानावरील हल्ला !
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर;
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हल्ला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
सपकाळ पुढे म्हणाले की, “सनातन धर्म”च्या नावाखाली द्वेष पसरवणारे आता न्यायाच्या मंदिरातही घुसलेत. ही केवळ धोक्याची घंटा नाही, तर संविधान, सामाजिक न्याय आणि समानतेवर थेट प्रहार आहे. उच्चवर्णीय मानसिकतेचं विष अजूनही या देशाच्या नसानसांत वाहतंय. जे संविधानाचं रक्षण करतात, जे अन्यायाविरुद्ध उभे राहतात. त्यांच्यावरच हल्ले होत आहेत.
हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, न्यायाचा आहे, समानतेचा आहे. कुणाच्याही जाती-धर्माच्या अहंकाराचा नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि सांगतो. आम्ही घाबरणार नाही, मागे हटणार नाही. संविधानावर हल्ला करणाऱ्यांना लोकशाहीच्या न्यायालयातच चपराक बसवली जाईल असेही सपकाळ म्हणाले.
