U Th 1

मुंबई, दि. 26 सप्टेंबर:

मराठा आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी मिळून जो निर्णय घेतला तो उच्च न्यायालयात आपण जिंकलो परंतु त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथेही आपण पूर्ण ताकदीने लढतो आहोत. देशातील सर्वोत्तम वकील आपण या खटल्यासाठी दिले आहेत.यात कुठेही सरकार कमी पडत नाही, पडू देणार नाही. अनपेक्षितपणे जी स्थगिती दिली गेली ती उठवण्यासाठी आपण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ही स्थगिती उठेपर्यंत न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेत इतर माध्यमातून मराठा समाजाला लाभ देणारे निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्येष्ठ विधी तज्ज्ञांशी सातत्याने सल्लामसलत सुरु आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकून शासन निर्णय घेत आहे. ही न्यायालयीन लढाई आहे. त्यामुळे न्यायदेवतेचा अवमान होणार नाही याची खबरदारी घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे. जिंकायची आहे. ती जिंकण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने मराठा समाजासोबत आहे. कोणत्याही समाजावर कोणताही अन्याय होऊ न देता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार  व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *