प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का?
पुणे, दि. २२ मार्च २५
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते, त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच फूस असावी असा संशय व्यक्त करून कोरटकर पळून जात असताना सरकार काय करत होते ? गृहविभाग झोपला होता काय? असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा दुसरा व्यक्ती राहुल सोलापूरकर पुण्यात राहतो पण सोलापूरकरवर गुन्हा दोखल होऊ शकत नाही असे पुण्याचे पोलीस आयुक्त सांगतात व त्याला पोलीस संरक्षण देतात. स्वारगेट बस स्टँडवर बलात्कार होतो, बीडमध्ये सरपंचाची क्रूर हत्या होते. परभणीत पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू होतो, पुण्यातील केंद्रीय मंत्र्याच्या कार्यकर्त्याला मारहाण होते, दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची जळगावात छेड काढली व तक्रार दाखल करायला मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावे लागते. राज्यात पोलिसांचा धाकच राहिला नाही. कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून देवेंद्र फडणविसांचा तुघलकी कारभार सुरु आहे. असे सपकाळ म्हणाले.