झटक्याने करा अगर पटक्याने, मटण खायला मिळायला पाहिजे.
मुंबई दि . १७ मार्च ‑
मंत्री नितेश राणे यांनी मटणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला आहे. राणे यांच्या भूमिकेशी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही असहमती दर्शवली आहे. मटणाच्या मुद्यावर रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत भूमिका मांडली आहे. मटण झटका असो वा हलाल आपल्याला खायला मिळालं पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.
नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटण विक्रीचा मुद्दा मांडला आहे, यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्याने करा. पण नितेश राणे एवढी हार्ड भूमिका घेऊ नका, असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी दिला. मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत. सर्वधर्मसमभावाचे देशात संविधान निर्माण झाले आहे, त्याचा विचार करता मी नितेश राणे यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याचा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत खरंतर त्यांना मंत्री करायला हवं होते. पण आता एकच मंत्रिपद राहिले असल्याने दलितांचा मतांचा विचार करता महायुती च्या राज्य सरकार मध्ये आमच्या पक्षाचा मंत्री करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा असं सांगितले आहे. यावर बोलताना रामदास आठवले यांनी ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितलं. तसेच मी देखील माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की, आता जय भीम आणि जय भारत म्हणा’.
प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले की, ‘प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना लोकांनी जास्त वाचू नये. जास्त वाचले की डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे वाद निर्माण होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील टीका ही चुकीची आणि मूर्खपणाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते, या नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे आहे. त्यावेळी नितेश राणे ही नव्हते आणि मीही नव्हतो. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख मुस्लीम होते, असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुस्लीम हे मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत आणि हाच इतिहास असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.