आता घरकुलांसाठी मोफत वाळू !
नागपूर, दि. १६ मार्च :
घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारने खूशखबर दिली असून, घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार आहे.
राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असून याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या. त्यांचा समावेश यामध्ये केला असून अधिकाऱ्यांच्या आजवर आठ बैठकी याबाबत घेण्यात आल्या. बावनकुळे म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे.
राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल. त्यामुळे पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल,असा दावा बावनकुळे यांनी केला.