कांदा निर्यात शुल्क माफ करा.
मुंबई, दि. ६ मार्च :-
शेतकऱ्यांसाठी शेततळे निर्माण करण्यासाठी योजना आहे. मात्र अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वितरित करण्यात यावे. इथेनॉलच्या धोरणाबाबत धरसोड पणा करण्यात येऊन नये. कांद्याचे दर कोसळले असून कांद्याचे निर्यात शुल्क हटविण्यात यावे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर पाठिंबा देताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल महोदयांच्या भाषणावर अभिनंदन प्रस्ताव मांडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, कांदा, नाशिक कुंभमेळा, महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न यासह विविध विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.
येवला मतदारसंघात पैठणीचे मोठ्या प्रमाणात काम चालते. याठिकाणी रेशीम उद्योगाचे काम पूर्वी झाले मात्र याठिकाणी अनुदान बंद झाल्याने शेतकऱ्यांनी रेशीम शेती बंद केली. सरकारने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना रेशीम शेती मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ते अनुदान मिळाले पाहिजे. राज्यात शक्ती पीठ सारख्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शासनाने अधिक लक्ष द्यावे त्यासाठी देखील निधीची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, माऊली सोट, कैलास बोऱ्हाडे या घटना राज्याला काळिमा फासणाऱ्या असल्याने यातील आरोपींना कडक शिक्षा करावी. तसेच या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षाचे नेते, विविध समाजातील पदाधिकारी, पत्रकार, साहित्यिक, समाज घटकांना एकत्र बसवून महाराष्ट्राचे क्रौर्य कसे थांबविणार आहोत यावर चर्चा करून सामाजिक सलोखा निर्माण करावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
ते म्हणाले की, मागच्या काही महिन्यात राज्यातील काही घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. यंत्राचा, तंत्रांचा,मंत्रांचा हा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई यांच्यासह विविध महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यापासून दृष्ट लागली आहे. बीड मध्ये संतोष देशमुख यांची घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा निषेध करतो. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडला आहे. या प्रकरणाची चौकशी होणार की नाही ? तो दलीत मागासवर्गीय आहे म्हणून कारवाई होणार की नाही ? लातूर मधील माऊली सोट या धनगर समाजाच्या मुलाला मारहाण करण्यात आली कुणी बोलणार की नाही हा महाराष्ट्र चालला आहे कुठे ? परवा शिवमंदिरात गेला म्हणून जालन्यात कैलास बोऱ्हाडे या धनगर व्यक्तीला लोखंडी सळईने चटके देण्यात आले या प्रकरणावर कुणी बोलणार आहे की नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे असे मत व्यक्त केला. तसेच या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षाचे नेते, विविध समाजातील पदाधिकारी पत्रकार, साहित्यिक यांना एकत्र बसवून महाराष्ट्राचे क्रौर्य कसे थांबविणार आहोत यावर चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले.
येवला शहरात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न अतिशय गंभीर आहे त्यामुळे नगरोत्थान योजनेतून पाणीपुरवठा योजनेसाठी मी प्रयत्न करतो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगूनही नगरविकास विभागाच्या सचिवांना SLTC बैठक घेण्यासाठी वेळ नाही. प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे,ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.मागेल त्याला सौर पंप योजना राबविली जात आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पंप मिळत नाही. त्यामुळे पॅनल वर कंपन्यांची संख्या वाढविण्यात यावी. पंतप्रधान घरकुल योजनांमध्ये अतिशय चांगले काम सुरू आहे, कधी नव्हे एवढे घरकुले आपण दिली
हर घर संविधान ही संकल्पना राबविण्यात येणार आहे ही अतिशय चांगली बाब आहे. त्याचबरोबर मराठी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाबाबत भारत सरकारचे मी अभिनंदन करतो. मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने काम केले यामध्ये प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांनी काम केले . चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र या ग्रंथाचा सुद्धा त्यात उपयोग झाला,त्यांचा देखील उल्लेख यामध्ये झाला पाहिजे.