शेतकऱ्यांच्या खात्यात आता वर्षाला १५ हजार रुपये!
मुंबई, दि. २६ फेब्रुवारी ;
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी बरोबरच राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत शेतकरी बांधवाना मिळत असलेल्या वार्षिक 6,000 रुपये अनुदानामध्ये आणखी 3,000 रुपयांची वाढ केली जाणार आहे.त्यामुळे दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये जमा होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण’ झाले. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनांमुळे मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होईल. यापूर्वीच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत बळीराजा संवर्धन योजनेच्या माध्यमातून सुमारे 25 हजार कोटींचे ८९ प्रकल्प विदर्भात पूर्ण केले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भात पहिल्या टप्प्यात 4 हजार कोटींची जलसंवर्धन व इतर विकासकामे राज्य सरकारने पूर्णत्वास नेली आहेत. आणखी 6 हजार कोटींची विकास कामे सुरु आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यात जलसंधारणाच्या सुमारे 150 योजनांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.