मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे !
शिर्डी, दि. २० जानेवारी: –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणाआडून मला जाणीव पूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे. आज कुणी निराधार व बिनबुडाचे आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित नव संकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व. संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली .
पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजित पवारांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ – १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले.
२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी आज प्रथमच बोलून दाखवली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव – वस्त्यांची जाती वाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले.
११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले.
विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.