महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा..
शिर्डी दि. १९ जानेवारी –
महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे, त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशापध्दतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडे तिकडे करणार्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे हे कृतीतून दिसले पाहिजे. नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांमध्ये जा… हा पक्ष लोकांचा वाटला पाहिजे यासाठी काम करा असा आदेशही अजित पवार यांनी दिला.
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहिल. यासाठी तुमची साथ मला हवी आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर २५ कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात ५० कार्यकर्ते तयार करा. त्यातून २० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल. राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणूकीत पक्षाला फायदा निश्चित होणार आहे असेही अजित पवार म्हणाले.
साईबाबांच्या कर्मभूमीत आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीतून विकासाची दिशा आणि पुरोगामी विचाराची वाटचाल आपण नवसंकल्प शिबीरातून करत आहोत. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा फलक (बोर्ड) आणि झेंडा कसा लागेल असा प्रयत्न सर्वांनी करा. हा महाराष्ट्र आहे. एकतेचा आणि समतेचा विचार इथे रुजलेला आहे. जातीपातीचे राजकारण जास्त दिवस चालत नाही. पण सध्या तशापध्दतीने जातीपातीचे राजकारण सुरू आहे याबद्दल नाराजीही अजित पवार यांनी व्यक्त केली.
महायुतीला बहुमत प्रचंड मिळाले असून जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपल्याला ती जबाबदारी पार पाडायची आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवायची आणि त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे याचा वेगळा विचार सध्या सरकार करत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत जे अभूतपूर्व यश पक्षाला मिळाले आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे असल्याची स्पष्ट कबुली अजित पवार यांनी दिली.
ज्यांची जनमानसात प्रतिमा खराब आहे त्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही असे स्पष्ट करतानाच पक्षात कुणाशीही गैरवर्तन होईल असे काम करणाऱ्या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल असेही अजित पवार यांनी जाहीर केले.
दरमंगळवारी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीला महिन्यातील एक दिवस ठरवून सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कामाबरोबरच पक्षाचाही कार्यक्रम घेणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय सहाय्यता कक्ष सेल आणि वचनपूर्ती सेल या दोन सेलची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता सेल हा उपमुख्यमंत्री कार्यालयातून राबवला जाईल तर वचनपूर्ती हा सेल उपमुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
आता तुमच्या सगळ्या सहकार्याने राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून हे काम करायचे आहे. त्यासाठी विधानसभेत जसे दौरे केले त्याचपध्दतीने महाराष्ट्रात दौरे करणार आहोत असे अजित पवार यांनी जाहीर केले.
दोन दिवसाच्या शिबीरात ज्या वक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या किंवा चांगले मार्गदर्शन केले त्यांचे कौतुकही अजित पवार यांनी केले.