HMPV चा प्रसार रोखण्यासाठी तातडीने हालचाल करा..
मुंबई, दि. ७ जानेवारी २०२५;
HMPV या विषाणूचे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक व आपल्या राज्यातही काही रुग्ण सापडले आहेत. नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे २ रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्राने सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना महामारीवेळी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे लागू करण्यास विलंब केला होता आता मात्र कोणत्याही प्रकारचा विलंब न करता HMPV चा प्रसार रोखला जाईल यासाठी दक्षता घेत तातडीने विमानतळ स्क्रीनिंग प्रोटोकॉल लागू करावा तसेच मार्गदर्शक नियमावली जाहीर करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
HMPV विषाणू संदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि केंद्र सरकारला पत्र पाठवले असून या पत्रात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना आपण सर्वांनी केला असून त्याचे दुष्परिणामही सर्वांना भोगावे लागले आहेत. कोरोनाने मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्तहानी तर केलीच पण त्यामुळे आपले न भरून निघणारे नुकसान केले आहे. कोरोनाच्या संकटातून आपण सावरलो असतानाच आता ह्यूमन मेटापन्यूमो विषाणूचा (HMPV) चीनमध्ये उद्रेक झाला आहे. कोरोना वायरसची सुरुवातही चीनमधूनची जगभर झाली होती.
एचएमपीव्ही विषाणूचा प्रसार होण्याआधी राज्य सरकारने त्वरित खबरदारीच्या उपाय योजना आणि उपचार पद्धतींबाबत योग्य जनजागृती केली पाहिजे, जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरणार नाही. सर्वात महत्वाच्या उपाययोजनांमध्ये चीनमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी तातडीने मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. चिनी नववर्षाच्या सुट्ट्या १५ जानेवारीपासून सुरू होतात आणि त्या कालावधीत सुट्टीसाठी बरेच प्रवासी भारतात येतात. आपल्या देशात देखील १४ जानेवारीपासून अनेक सण साजरे करण्यास सुरुवात होते. या सणासुदीच्या दिवसांत बाहेर होणाऱ्या गर्दीत चीनहुन आलेले प्रवासी सुद्धा मिसळले जाण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे विमानतळ स्क्रीनिंग प्रोटोकॉल त्वरित लागू करावा. कोरोनाच्या वेळी आपण विमानतळ स्क्रीनिंग प्रोटोकॉल लागू करण्यास विलंब केल्याचे परिणाम भोगले आहेत असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.