मविआला विजयी करून २३ तारखेला दिवाळी !
मुंबई, दि. १३ नोव्हेंबर;
मुंबईकरांनी लोकसभा निवडणुकीलाच आपला कौल महाविकास आघाडीला देऊन विधानसभेचा निकाल दिला आहे. लोकसभेला ६ पैकी ४ जागा जिंकल्या पण पाचवी जागा केवळ ४८ मतांनी हरलो, आता विधानसभा निवडणुकीत मात्र २० तारखेला जागरुक नागरिकाची भूमिका बजावा मग आमदार आणि मुख्यमंत्रीही मविआचाच होणार. मविआला विजयी करा आणि २३ तारखेला धुमधडाक्यात दिवाळी साजरा करा, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
वांद्रे पश्चिम विभानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आसिफ झकारिया यांच्या प्रचारासाठी वर्षा गायकवाड यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी भाजपावर तोफ डागत त्या पुढे म्हणाल्या की, शिंदे भाजपा सरकारने स्मार्ट सीटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उळधपट्टी केली. शहर सौंदर्यीकरणावर १७०० कोटी रुपये खर्च केले, त्यासाठी लावलेले चायना दिवे गेले कुठे? असा सवाल उपस्थित करत या भ्रष्ट सरकारने महानगरपालिकेच्या बँकेतील ठेवीवरही हात साफ केला आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा लुटून स्वतःचे खिसे भरले आहेत. मुंबईकर आजही खड्यातून प्रवास करत आहेत. केवळ लाडके कंत्राटदार व लाडके उद्योगपती यांच्यासाठी शिंदे भाजपा सरकारने काम केले असून सामान्य मुंबईकरांना मात्र विकासापासून वंचित ठेवले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅग दोनदा तपासण्यात आल्या, नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाने काम करावे त्याला कोणाचाही विरोध नाही पण विरोधकांच्या बॅगा तपासून त्यांचा अपमान करता मग नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा का तपासत नाही? महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रशासन आणि निवडणूक आयोग फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांचीच तपासणी करणार का? विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचे भेट वस्तू वाटप करणाऱ्या तक्रारी केल्या, सत्ताधारी पक्षाचा भ्रष्ट प्रकार पुराव्यानिशी उघड करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नियम आणि कायदे फक्त विरोधकांसाठी आहेत का? असा संतप्त सवाल वर्षा गायकावड यांनी केला आहे.