सत्तेसाठी भाजपाने ठाकरे व पवारांचे घर फोडले..
मुंबई, दि. १२ नोव्हेंबर ;
इंग्रजांनी भारतात राज्य करताना ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा वापर केला होता. भारतातील जाती धर्मात फूट निर्माण करून आपली खूर्ची घट्ट करण्याची निती भारतीय जनता पक्षाने ब्रिटीशांकडून घेतली आहे. भाजपाच्या डीएनएच फूट पाडा व राज्य करा अशी असून कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ हैं असे नारा देऊन जनतेची मते मागत आहे. तसेच भाजपा कुटुंब तोडणारा पक्ष आहे. महाराष्ट्रात भाजपाने सत्तेसाठी ठाकरे व पवारांचे कुटुंब फोडले असा घणाघाती हल्ला राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी यांनी केला आहे.
राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद तिवारी म्हणाले की, मोदी शाह यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प एकएक करून गुजरातला पळवून घेऊन गेले. महाराष्ट्राचे हित न पाहता शिंदे फडणवीस अजित पवारांनी महाराष्ट्राची कुर्बानी दिली. पाच वर्ष सत्तेत असताना काय केले हे भाजपा सांगत नाही, विकास कामाच्या जोरावर मते मागत नाही तर समाजात फुट पाडणाऱ्या घोषणा देऊन मते मागत आहे पण नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांच्या सभांना लोकांची गर्दी होत नाही हे चित्र पाहून भाजपाने त्यांचे जुळेभाऊ ओवेसींनाही प्रचारात उतरवले आहे. भाजपा व ओवेसी यांचे काय नाते आहे असा सवाल प्रमोद तिवारी यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ज्याला आपल्या मुलासारखे सांभाळले त्या अजित पवारांनी सत्तेसाठी काकाला सोडले आणि ज्या ठाकरे कुटुंबांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व उभे केले तेही स्वार्थासाठी, खुर्चीसाठी भाजपाबरोबर गेले ते जनतेचे होणार नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार व भाजपाने महाराष्ट्र हिताचे रक्षण केले नाही त्यांना पुन्हा सत्ता देऊ नका, महाराष्ट्राचा स्वाभिमान व भविष्यासाठी मविआला विजयी करा असे आवाहनही प्रमोद तिवारी यांनी केले.
या पत्रकार परिषदेला मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते आदी उपस्थित होते.