मुंबई, दि. ११ नोव्हेंबर;
भारतीय जनता पार्टीने समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून तयार केलेले हे संकल्प पत्र हे राज्याच्या जनतेचे आकांक्षा पत्र आहे. भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी राखणारे ठरेल.या संकल्पपत्राच्या आधारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर्सचे उद्दीष्ट पार करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
महाराष्ट्र भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते पत्रकारांना संबोधित करीत होते. यावेळी अमित शाह म्हणाले की भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. जम्मू – काश्मीर चे 370 वे कलम रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती (सीएए), राम मंदिर उभारणी अशी भाजपाने पूर्ण केलेल्या अनेक आश्वासनांची उदाहरणे अमित शाहा यांनी यावेळी दिली.
2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय घेतले. महायुती सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या निळवंडे, गोसीखुर्द, टेंभू या सिंचन योजना, कोस्टल रोड, अटल सेतू सारखे रस्ते, पूल, नार पार सारखे नदीजोड प्रकल्प अशा अनेक योजनांचा उल्लेख केला. आजवर राज्यातील कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राजकारणाने शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा नेहमी घात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचनाच्या प्रश्नांकडे, रस्ते वगैरे विकासाच्या योजनांकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या व इतर प्रश्नांवर सर्वप्रथम भाजपा सरकारने उपाय केले. संविधानाची खोटी लाल प्रत हातात घेऊन मतदारांची फसवणूक करणाऱ्या राहूल गांधी यांच्या कॉंग्रेस आणि माविआला लोकांनी साथ देऊ नये, असे आवाहनही अमित शाहा यांनी केले.
अमित शाह पुढे म्हणाले की अंतर्विरोधाने भरलेल्या महाविकास आघाडीने सत्तेसाठी तुष्टीकरणाची विचारधारा स्वीकारली आहे. तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांत निवडणूक काळात दिलेली आश्वासने काँग्रेस सरकारला पूर्ण करण्यात अपयश आले आहे. कर्नाटकमध्ये अनेक गावेच्या गावे ‘वक्फ’ ची मालमत्ता म्हणून घोषित झाली आहेत, सामान्य माणसाची मालमत्ता वक्फ च्या घशात जात आहे, हे रोखण्यासाठीच मोदी सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणले आहे.
महाराष्ट्रात धार्मिक आधारावर महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे फतवे काढले जात आहेत, हे फतवे आपल्याला मान्य आहेत का, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावे असेही अमित शाह म्हणाले.