मविआचे सरकार चोरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा…
मुंबई, दि. ११ नोव्हेंबर;
भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थान मध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले,त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून भाजपाला विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकवून घरी बसवा व काँग्रेस मविआचे सरकार विजयी करा,असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.
राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला अशोक गेहलोत संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. या भूमीतून अनेक मोठे नेते होऊन गेले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य असून विधान सभेची ही निवडणुकी देशाची दिशा व दशा ठरवणारी आहे, या निवडणुकीचा संदेश देशभर जाणार आहे. काँग्रेस मविआकडे अनेक अनुभवी नेते आहेत ज्यांनी सरकार चांगल्या प्रकारे चालवले आहे. काँग्रेसच्या ५ गॅरंटी व मविआने महाराष्ट्रनामा मधून जनतेच्या हिताचे वचन दिले आहे. महिलांना प्रति महिना ३००० रुपये, मोफत बस प्रवास, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी यारख्या लोकोपयोगी योजनांचे आश्वासन दिले आहे. भारतीय जनता पक्ष फक्त जाहिरताबाजी करून जनतेची दिशाभूल करत असते. पण त्याला आता महाराष्ट्रातील जनता भूलणार नाही.
भाजपा एक मुख्यमंत्री ‘बटोंगे तो कटोंगे’ असा नारा देत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान ‘एक हैं तो सेफ हैं’,चा नारा देत आहेत. पण निवडणूक आयोग त्यावर काहीच कारवाई करत नाही. निवडणूक आयोगही सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामागेही मोठे षडयंत्र आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारच्या काळात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडलेली असून मुंबईत २७ टक्के वैद्यकीय कर्मचारी कमी आहेत. MRI, CT scan मशिन बंद आहेत, औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याउलट राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने आरोग्य सेवा सुलभ व वाजवी दरात मिळावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. आरोग्याचा मुलभूत अधिकार लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे. या योजनांचा गाभा चिरंजीवी योजना आहे. २५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच दिले, १० लाख रुपयांचा कुटुंब अपघात विमा योजना सुरु केली होती. चिरंजीवी योजनेतून मोफत औषधे देण्यात येत होती असेही गायकवाड यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते आदी उपस्थित होते.