• Wed. Dec 4th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी.

Visits: 108 Today: 2 Total: 3911743

मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर ;

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉँग्रेसने मुंबईत जे अकरा उमेदवार दिले आहेत त्यातील केवळ दोनच उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणाऱ्या कॉँग्रेसबद्दल आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करा, असे आव्हान मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

ॲड. शेलार यांनी सांगितले की, या निवडणुकीत कॉँग्रेसने मराठी चेहरे डावलत वरिष्ठ मराठी नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी ,महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य होऊ देणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका होती. आंदोलक मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या गेल्या. १०६ मराठी माणसे हुतात्मा झाली. आताही तीच मराठी द्वेष्टी भूमिका घेत काँग्रेसने मराठी माणसांना उमेदवारी डावलल्याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.

या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी मुख्य लढत आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि महायुतीच्या कारभाराची अडीच वर्षे अशी तुलना होणे स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे स्थगितीचे वाहक आणि महायुती म्हणजे प्रगतीचे शिलेदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांना निर्णय घेणे आता खूप सोपे आहे. सामना सोपा होत चालला आहे आणि महाराष्ट्रातील जनता आम्हालाच कौल देऊन महायुती सरकार सत्तेवर येईल,असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

जम्मू काश्मीरमध्ये नवे सरकार सत्तेत आल्यापासून तेथील हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी, समाजकंटक, दहशतवादी या कायदा आणि सुव्यवस्थेला अडचणी आणणाऱ्या बाबी तेथे आल्या आहेत. कारण तेथे इंडी आघाडीचे सरकार सत्तेत आले. जोवर केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारचे नियंत्रण होते तेव्हा अशा घटना घडत नव्हत्या. महाविकास आघाडीतील पक्ष ज्या ज्या राज्यात जातात तेथे तेथे अशांतता, अस्थैर्य निर्माण होते. समाजकंटक, अतिरेकी असे घटक वाढतात. म्हणून महाविकास आघाडीला हद्दपार करा, असे आवाहन ॲड. शेलार यांनी यावेळी मतदारांना केले.

ॲड. शेलार म्हणाले की , आघाडीतील घटक पक्ष याकूब मेमनचे समर्थन करतात. इब्राहीम मुसा हा बॉम्बस्फोटातील दोषसिद्ध आरोपी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करतो. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना लागलेल्या गोळ्या या कसाबने झाडलेल्या नव्हत्या असे म्हणणाऱ्या प्रवृत्तीला दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या महायुती सरकारच्या हस्तक असल्याचा बिनबुडाचा आरोप करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे आरोप सिद्ध करावेत. त्यांना आम्ही ७ दिवसांची नोटीस पाठवणार असून , निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. एखाद्या शासकीय अधिकाऱ्यावर असे बेछूट आरोप करत त्यांना लक्ष्य करणे, त्यांचा छळ करणे हे अतिशय निषेधार्ह आहे. अशी भूमिका पुढे काँग्रेसला महाग पडू शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या मनासारखे झाले की निवडणूक आयोग निष्पक्ष आणि मनासारखे झाले नाही की पक्षपाती असे काँग्रेसचे धोरण आहे, त्यामुळे उद्या पराभव झाला की खोटे अश्रू ढाळू नका, असा टोलाही ॲड. शेलार यांनी काँग्रेसला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *