मुंबई, दि. ६ ऑक्टोबर;
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मागील दोन वर्षात सर्वच क्षेत्राच महाराष्ट्राची अधोगती झालेली असताना भाजपा सरकारने कोणते प्रगती पुस्तक जाहीर केले, असा सवाल करत मुंबईकरांचे जगणे कठीण झाले आहे, कधी होर्डींगच्या खाली उभे राहिलेल्या लोकांचा बळी जातो तर कधी रेल्वेतून पडून मृत्यू होत आहेत. रेल्वेतून पडून दररोज ७ लोकांचे मृत्यू होतात आणि भाजपा बुलेट ट्रेनची चर्चा करते. रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे, हिट अँड रन मध्ये कधीही कोणाचाही मृत्यू होऊ शकतो.
मुंबईतील जमिनी विकल्या जात आहेत. महिलांच्या अत्याचारात महाराष्ट्राचा वरचा नंबर लागतो. महिला अत्याचार वाढत असताना शक्ती कायदा दोन वर्षापासून केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पडून आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, महात्मा ज्योतिबा फुले आयोग्य योजनेचे पैसे मिळत नाहीत, संजय गांधी निराधार योजनेतील पैसेही मिळत नाहीत. भाजपा युती सकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला असून या निवडणुकीत महाभ्रष्ट महायुतीचा सरकारचा पराभव करून महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास खा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष युती सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याने भाजपाच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त आदी उपस्थित होते.