• Thu. Oct 17th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 3 Today: 3 Total: 3843665

सांगली, दि. १७ ऑक्टोबर;

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस नाही असे सातत्याने शरद पवार सांगत आले आहेत परंतु सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या समोरच या भागातील सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतो, असे शरद पवार यांनी जाहीर केल्याने चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’च्या इस्लामपुर-वाळवा येथील सांगता सभेत शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची, सावरण्याची भूमिका खांद्यावर घ्यावी. उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी इस्लामपूर परिसरातून होणार आहे. जयंत पाटील ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडत आहेत, काम करत आहेत, कष्ट करत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिक पणाने एका विचाराने निश्चित उभी राहील आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राबद्दलचे आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही असे पवार म्हणाले.

 

महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उद्याचा महाराष्ट्र कसा होणार? आणि कसा केला जाईल? यासंबंधीची भूमिका मांडली. ती भूमिका कृतीमध्ये आणण्यासाठी अनेकांनी कष्ट केले. पण हल्लीच्या काळामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हिताची जपणूक हा विषय त्यांच्या समोर राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र अनेक क्षेत्रांमध्ये कमी आहे. इतर राज्यांशी तुलना केली तर महाराष्ट्र खालच्या पातळीवर दिसतो. एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्य, हा महाराष्ट्राचा लौकिक होता, तो लौकिक आज घसरलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सावरायचा, महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणायचा हे काम खऱ्या अर्थाने करायचे आहे. त्यासाठी निवडणुकीचा काळात एक प्रकारचे जनमत तयार करा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *