परांडा, दि. १५ सप्टेंबर;
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या विरोधक कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करणाऱ्या काँग्रेस सरकारबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकात गणपती बाप्पांच्या मूर्तींनाच अटक केल्याचे पापं कुठे फेडणार, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रचार-प्रसार मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून राजकारण केलं गेलं. मात्र गणेशोत्सवाचे पावित्र्य भंग करणाऱ्या कर्नाटक सरकारबाबत ते गप्प आहेत. कर्नाटकात गणेश उत्सव बंद करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केला. ते इतक्यावरच थांबले नाही तर गणपत्ती बाप्पाच्या मूर्तींना अटक करण्यापर्यंत काँग्रेस सरकारची मजल गेली. यावर विरोधकांकडून चकार शब्द निघाला नाही, असे ते म्हणाले. विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना घरी पाठवण्याचे काम राज्यातील बहिणी करतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना लगावला.
मविआ सरकारच्या काळात अडीच वर्ष शिवसैनिकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागला म्हणून आम्ही उठाव केला. बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आणले आणि मविआ सरकार उलथावून टाकले. त्यानंतर राज्यातील विकास प्रकल्प सुरू केले. तिसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले याचा अभिमान वाटतोय, असे ते म्हणाले. लोक सत्ता सोडत नाहीत पण आम्ही सत्ते विरोधात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार आणले, असे ते म्हणाले.
माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरता हे सरकार मर्यादित नाही तर अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ असून योजने आड कोणीही आले तरी ही योजना बंद पडणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत कळणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, अशी टीका त्यांनी केली.
रक्षाबंधन आणि भाऊबिजेसाठी नाही तर माहेरची ओवाळणी दर महिन्याला महिलांना न चुकता मिळणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. या योजनेत खोडा घालणाऱ्या दुष्ट सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी योग्य वेळी जोडा दाखवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.