धाराशिव, दि. १५ सप्टेंबर ;
शेतकऱ्यांसाठीही राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करून देशात पहिल्यांदाच राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.यासोबतच शेतकऱ्यांना केवळ एक रुपये विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ दिला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात शुल्क रद्द करण्याचा आणि खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला दर मिळण्यास मदत होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले.
उजनी धरणातून सीना-कोळेगाव प्रकल्पात पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी येत्या पंधरा दिवसात बैठक घेणार आहे. पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून गेल्या तीस वर्षांपासून प्रतीक्षा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.