• Thu. Oct 10th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात.

ByXtralarge News

Sep 13, 2024
Visits: 72 Today: 1 Total: 3834043

मुंबई, दि. १३ सप्टेंबर : –

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला ‘जागतिक आर्थिक केंद्र’ म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या एमएमआर वर्ल्ड ईकॉनॉमी हबसाठीच्या सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमार तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. क्लॉस श्वाब यांनी स्वाक्षरी केल्या व करारांचे अदान-प्रदान केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा शुभारंभ होत आहे. मुंबई महानगर प्रदेश हे जागतिक आर्थिक केंद्र व्हावे हे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होत असल्याचा विशेष आनंद आहे. मुंबई ही आम्हा सर्वांसाठीच जीवनवाहीनी आहे. हा एक महत्वपूर्ण क्षण आहे. मुंबई बदलली तर महाराष्ट्र आणि देशासाठीही महत्वाचा बदल होणार आहेत. आम्ही राज्याच्या विकासासाठी स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेने राज्याच्या विकासासाठी शिफारस आणि आराखडा सादर केला आहे. या आराखड्याला बळ मिळेल अशी संकल्पना घेऊन निती आयोग पुढे आला आहे. सात बेटांवरील मुंबईचा विकास आता एमएमआर आर्थिक केंद्र होण्यासाठी सात महत्वाच्या शिफारशी निती आयोगाने केल्या आहेत. मुंबई ही भविष्यात ग्लोबल फिनटेक कॅपिटल होईल, असा विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलीयन डॉलर्स करण्याचे संकल्प केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यात महाराष्ट्राचे एक ट्रिलीयन डॉलर्सचे योगदान असेल असे नियोजन केले आहे. दावोस मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून विक्रमी अशी गुंतवणूक आली. तसेच जगभरातील महत्वाच्या उद्योगांनी महाराष्ट्रासाठी पसंती दिली. यातून मोठी गुंतवणूक येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. यातून जागतिक आर्थिक केंद्राला बळच मिळणार आहे. एमएमआर जागतिक आर्थिक केंद्राच्या या संकल्पनेला साकार करण्यासाठी एमएमआरडीएध्ये विशेष मध्यवर्ती कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचेही मुख्यंत्र्यांनी सांगितले.

मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून या परिसरात मोठ्या क्षमतेचे डाटा सेंटर, वाढवण, दिघी या बंदरामुळे परिसराचा कायापालट होईल. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल. महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणूकदारांना सुविधा देण्यात येताहेत. महाराष्ट्र परकीय गुंतवणूक मिळवणारे भारतातील प्रथम क्रमाकांचे राज्य आहे. यामुळे रोजगार, स्टार्टअपस्, क्लीन एनर्जी यामध्येही महाराष्ट्र नेतृत्व करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *