मुंबई दि. १० सप्टेंबर :-
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३,४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात अद्याप केंद्रीय कृषीमंत्री आले नाहीत. त्यासाठी महायुती सकारने पाठपुरावा केला नाही. केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत का? केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राला ही सापत्न वागणूक का? केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? अशा प्रश्नांचा भडीमार विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले नाहीत. महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी आग्रह धरायला हवा होता. पण तसे झाले नाही. सरकारने केंद्र सरकारशी मदतीसाठी आग्रह धरलेला नाही. उलट पाऊस जास्त झाला आणि कमी झाला तरी कृषीमंत्र्याला शिव्या खाव्या लागतात. एवढ्या नर्तकी कशाला नाचवतो अशी विरोधक माझ्यावर टिका करतील अशी मुक्ताफळं उधळत राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जबाबदारी झटकली आहे.
शेतकरी सरकारच्या मदतीची वाट पाहत आहे. परंतु केंद्र सरकारचे पथक साधी पाहणी करायला देखील आले नाही. केंद्राच्या मदतीसाठी पाठपुरावा करणार कोण? आम्ही कोणाला जाब विचारायचा याचे उत्तर कृषीमंत्र्यांनी दिलं पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी येणार?केंद्रीय कृषी मंत्री नाही तर केंद्रीय पथक तरी मराठवाड्याचे झालेले नुकसान पाहायला येणार का? महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळणार की नाही? मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा केली का? याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादात हे सरकार अडकले आहे. या सरकारमधील मंत्री स्वत:च्या मुलीला, जावयाला नदीत ढकला असं म्हणत असेल तर या सरकारकडून जनतेने कोणती अपेक्षा करायची. फसव्या योजनांना महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. बाँम्बेचं मुंबई असं नामकरण करण्यात भाजपचं योगदान आहे असं भाजपचे नेते म्हणत आहेत. कारण लोकसभेला जनतेनं नाकारल्यामुळे विधानसभेला मतं मिळविण्यासाठी अशी वक्तव्ये पुढे येत आहेत. महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावचा रंग उडाला असून शेतकरी यांना धडा शिकविणार आहे.
केंद्र सरकार आणि गुजरातकडे महायुतीने स्वाभिमान गहाण ठेवला आहे. आता शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने केंद्रात जाऊन पाया पडावं आणि शेतकऱ्यांना मदत मिळवावी, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे कान टोचले आहेत.