• Mon. Sep 16th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणे अभिमानास्पद.

ByXtralarge News

Sep 4, 2024
Visits: 69 Today: 2 Total: 3798671

मुंबई, दि. ४ सप्टेंबर –

राष्ट्रपतींच्या हस्ते संसदपटू पुरस्कार मिळणे हे राजकारणात, समाजकारणात जे काम करतात त्यांच्यासाठी बहुमोल असा ठेवा असतो. विधिमंडळात काम करताना त्या कामाची दखल विधिमंडळाने घेणे आणि विधिमंडळाने आपल्याला निवडल्यानंतर देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणे हे निश्चितच अभिमानास्पद आहे, असे उद्गार पुरस्कारानंतर भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी काढले.

यातून पुन्हा काम करण्यासाठी आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला प्रेरणा, ऊर्जा मिळते. आणखी ताकदीने हा पुरस्कार आम्हाला कामाला लावतो, असेही दरेकर म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना एसटी कामगारांच्या संपावर दरेकर म्हणाले कि, एसटी कामगारांच्या संपाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. एसटी कर्मचारी महाराष्ट्राला अविरत सेवा देतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता विपरीत परिस्थितीतही काम करतात. त्यामुळे हा विषय शासनाने प्राधान्याने घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

दरेकर पुढे म्हणाले कि, एखादी मोठी यंत्रणा जेव्हा स्कीम राबवायची असते तेव्हा यंत्रणा कमी पडते. यंत्रणेत जसे जसे दोष येतात ते आपण दुरुस्त करत असतो. एकाच नावे अनेकांनी पैसे घेतले असतील तर ते परत घेतले जातील. संबंधितांवर कारवाई केली जाईल. या योजनेचा दुरुपयोग किंवा गैरफायदा कुणीही घेऊ नये. ही सर्वसामान्य गरीब, गरजू महिलांसाठी योजना आहे. ज्याकाही तांत्रिक बाबी आहेत त्या दुरुस्त करून ही योजना योग्य त्या व्यक्तींकडेच जाईल याची सरकार काळजी घेईल असेही दरेकर म्हणाले.

राजन साळवी यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले कि, उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मंत्री आहेत. ते त्यांच्याच धनुष्यबाण चिन्हावर लढतील. राजन साळवी यांनी उदय सामंत कुठल्या चिन्हावर लढतील याची काळजी करण्याचे कारण नाही. आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यांनी त्यांचे चिन्ह काय असेल याची काळजी राजन साळवी यांनी करावी असा टोलाही दरेकरांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *