• Mon. Sep 16th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 88 Today: 1 Total: 3799305

 

मुंबई, दि. २८ ऑगस्ट –

विरोधकांनो सरकारच्या नावाने किती रडणार. परंतु कितीही रडलात तरी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा मागाठाणे विधानसभा शिवराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात बोलताना केला.

मंगळवारी चिंतामणी प्लाझा, अशोकवन दहिसर पूर्व येथे भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवराज प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी यावेळी दिसून आली. तसेच यावेळी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत ‘गोविंदा आला रे’ हा हिंदी, मराठी गीतांचा नृत्यांगणांसह बहारदार कार्यक्रमही सादर करण्यात आला.

यावेळी बालगोपाळांचा उत्साह वाढविताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यंदा उत्साह गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. लोकप्रतिनिधिंच्या मागणीनुसार आपल्या सरकारने गोविंदाला खेळाचा दर्जा दिला. तसेच प्रो-कबड्डी सारखा प्रो-गोविंदा आयोजित केला. गोविंदा देशातच नाही तर सातासमुद्रापार स्पेनलाही पोचलाय. गोविंदांसाठी आपण विमा काढलाय. गोविंदा सणाला सुट्टी नसायची. गेल्या वर्षी सरकारने सुट्टी जाहीर केली. आपल्या सरकारने गोविंदाला चांगला दर्जा देण्याचे कामं केलेय. दोन वर्षांपूर्वी आपले सरकार आले त्यावेळी सर्व सण, उत्सव बंद होते. त्यानंतर पहिलाच गोविंदा आला तो आम्ही निर्बंधमुक्त केला.

हे सरकार तुमचे, सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे आहे. आपले सरकार सर्व क्षेत्रात कामं करतेय. मुंबईत पुढील दोन-अडीच वर्षात एकही खड्डा शोधून सापडणार नाही. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतलाय. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जाहीर केलेय महाराष्ट्र, मुंबई पॉवर सेंटर झाले पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही कामं करतोय. कमी कालावधीत आम्ही जास्त कामं करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबई बँकेतर्फे १ लाखापर्यंत महिलांसाठी शून्य बॅलन्स खाते उघडण्याचा निर्णय घेतला. आम्ही दीड हजारावर थांबणार नाही. तुम्ही ताकद दिली तर दोन, अडीच हजार करू. ताकद वाढवलात तर तीन हजार करू. कारण महिलांना लखपती झालेले आम्हाला बघायचे आहे. हे फक्त आश्वासन नाही तर आम्ही जे बोलतो ते करतो.

विकास, कल्याणकारी योजनेसह आपली संस्कृती, परंपरा, सणही मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायला पाहिजेत. आपण लाडकी बहीण दिली. आता सुरक्षित बहीण आपल्याला द्यायची आहे. त्यासाठी हे सरकार कुठेही कमी पडणार नाही. ज्यांनी माझ्या मुली, महिला, भगिनी, माता यांच्यावर अत्याचार केला तर त्या गुन्हेगाराला माफी नाही हे सरकारचे धोरण असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, काही लोकं बोलतात दीड हजारात काय मिळणार. अरे बाबा जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काय कळणार. माझ्या माता-भगिनींना कळणार. आता तीन हजार खात्यात आलेत. हे सरकार काढणारे नाही तर देणारे असल्याचेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्री राम अशा घोषणा देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. ते म्हणाले की, प्रभू श्रीकृष्णाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात. आपण हंडी फोडतो त्या हंडीत काल्याचा प्रसाद असतो. हंडी तर एकच जण फोडतो पण प्रसाद सर्वांसाठी असतो. दहीहंडीचा उत्सव हा सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे. सर्व समाज आम्ही एक आहोत हे सांगणारा उत्सव आहे. प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा संदेश दिला तो संदेश पसरविण्याचा उत्सव आहे. प्रभू श्रीकृष्णाने जो कर्मयोग सांगितला त्या कर्मयोगाचा हा उत्सव असल्याचेही फडणवीस म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई महिला मोर्चाच्या माधुरी रावराणे, महामंत्री कृष्णकांत दरेकर, सहकाराचे जिल्हा अध्यक्ष अमोल खरात, युवा मोर्चा अध्यक्ष अमित उतेकर, विनायक राजेशिर्के, वॉर्ड अध्यक्ष संजय घाडी, वॉर्ड अध्यक्षा प्रियंका रेडकर, झोपडपट्टी जनता परिषदचे अध्यक्ष सौधागर धस, गुजराती सेलचे अध्यक्ष जयेश भानुशाली, मागाठाणे विधानसभा उपाध्यक्ष विवेक नार्वेकर यांसह मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *