बुलढाणा, दि. १४ ऑगस्ट ;
देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत पण महाभ्रष्ट महायुती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. महागाई व बेरोजगारी नियंत्रणाचा कार्यक्रम या सरकारकडे नाही. लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपा युतीला धडा शिकवला आहे आता विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी २/३ बहुमताने विजयी होऊन सरकार बनवेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह विदर्भ दौ-यावर असून ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले पण ते विधेयक अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी बनवलेले नाही. ते अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे. सरकारने कोणाशीही चर्चा न करता, अल्पंसख्यांकांच्या भावनांचा विचार न करता, मुस्लीम समाजाचा विरोध असताना आणले आहे. लोकसभेत या विधेयकाला विरोध झाल्याने ते जेपीसीकडे पाठवावे लागले. केंद्रातले सरकार जनभावनेच्या विरोधात ठरावीक लोकांच्या हितासाठी काम करत आहे.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. मराठवाड्यातील आढावा बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या विरोधातही जनतेत प्रचंड रोष असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्यांच्या मागे चौकश्या लागल्या होत्या तेच लोक सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकार भ्रष्ट मार्गाने सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे, अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. महायुती सरकार जनतेसाठी नाही तर सत्तेसाठी काम करत आहे. या सरकारला बहिण नाही तर सत्ता लाडकी आहे. जनताच आता या सरकारला पायउतार करणार आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकार ही लुटारुंची टोळी आहे. भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे, तिजोरीत पैसे नसताना ५ लाख कोटींचे कर्ज काढून टेंडरची कामे काढली आहेत व त्रिकुटांनी मिळून ३० टक्के कमीशन खाल्ले आहे. समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचे ९०० कोटींचे टेंडर काढले पण ते रद्द करून नंतर १८०० कोटी रुपयांचे केले व दुसऱ्याला दिले. मुंबईतील १० लाख कोटींच्या जागा अदानीच्या घशात घातल्या आहेत. सर्व कामात कमीशन खाण्यापलिकडे काहीच काम झाले नाही. या सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी बोलताना विधान परिषदेचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, राज्यातील सुशिक्षित तरुण शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहे पण महायुती सरकार नोकर भरती करत नाही. एमपीएससीच्या जागा भरल्या जात नाहीत. सरकार ७५ हजार जागा भरणार होते त्या भरल्या नाहीत पण अदानीचे घर मात्र भरले जात आहे. लोकसभेला चांगले यश मिळाले म्हणून घरी बसू नका, बाहेर पडा, जनतेमध्ये जा, त्यांचे काम करा. काँग्रेसच्या विचाराची सत्ता राज्यात आली पाहिजे त्यासाठी काम करावे लागेल, असे पाटील म्हणाले.