मुंबई, दि. १२ ऑगस्ट;
देहरादूनमधील एका बिल्डरच्या हत्येतील आरोपी आणि आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यापारी गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरे यांचे कोणते व्यावसायिक संबंध आहेत ? अशा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.
निरुपम म्हणाले की, ७ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकिय निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासणे आवश्यक आहे. ठाकरे जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा हॉटेल ताज किंवा मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्य करतात पण यावेळी ते संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी का थांबले होते? असा प्रश्न त्यांनी केला.
दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे अजय गुप्ताला भेटले का ? असा सवाल संजय निरुपम यांनी केला. अजय गुप्ता बिझनेसमन आणि कुख्यात गुंड आहे. बाबा सहानी यांच्या आत्महत्येतील आरोपीशी उद्धव ठाकरे यांचा व्यावसायिक संबंध असल्याची शक्यता (?) निरुपम यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर उबाठाला नुकताच निवडणूक आयोगाने देणगी स्वीकारण्यास परवानगी दिली, मग गुप्तासोबत भेट ही निवडणूक निधीसाठी होती का? असा प्रश्न निरुपम यांनी विचारला.
निरुपम पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि कुंटुंबियांची परदेशात मोठी गुंतवणूक आहे असे कळते. लंडन ला घर, इतर मोठी हॉटेल्स आहेत. आफ्रिकेत देखील उद्धव ठाकरे यांची गुंतवणूक आहे का? या गुंतवणुकीत गुप्ता बंधूंची भागिदारी आहे का ? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे, असे आव्हान निरुपम यांनी दिले.
संजय राऊत बिल्डरांशी दलाली करण्यात कुख्यात आहेत. पत्रा चाळ घोटाळ्यात त्यांनी बिल्डरांकडून मोठी दलाली मिळवली. यासाठी राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे बाबा सहानीसोबत किंवा गुप्ता बंधूंबरोबर राऊत यांचे काही संबंध आहेत का ? याचीही चौकशी होणे आवश्यक. गुप्ता बंधूंबाबत निरुपम म्हणाले की राजेश गुप्ता, अतुल गुप्ता आणि अजय गुप्ता हे उत्तराखंडमधील सहारनपूर येथील रहिवाशी आहेत. ते १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यापारानिमित्त गेले आणि तिथेच एक भ्रष्ट आणि कुविख्यात व्यापारी बनले. आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जेकब झुमादेखील गुप्ता यांचे बिझनेस पार्टनर होते. २०१८ मध्ये गुप्ता बंधूंचे घोटाळे उघड झाले. दक्षिण आफ्रिका सरकारमधील विविध खात्यांमधून प्रचंड फायदा उचलला. यानंतर जेकब झुमा यांची सरकारमधून हकालपट्टी झाली. या घोटाळ्यांनंतर फरार झालेल्या तिन्ही गुप्ता बंधूंविरोधात नवीन सरकारने इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अजय गुप्ता यांनी नव्या सरकारशी चर्चा करुन या घोटाळ्यातून आपले नाव कमी करुन घेतले. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता दोघेही फरार असून अजय गुप्ता मात्र मुंबईत वास्तव्य करत आहेत, असे निरुपम म्हणाले.
अजय गुप्ता आणि अतुल गुप्ता हे देहरादून येथील सचिंदरसिंग सहानी (बाबा सहानी) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. सहानी हे १५०० कोटींचे डेहराडूनमध्ये मोठे कॉम्प्लेक्स तयार करत होते मात्र त्यांना पैशांची चणचण होती. २४ मे रोजी बाबा सहानी यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत गुप्ता बंधूंची नावे होती. तत्पूर्वी बाबा सहानी यांनी १६ मे रोजी देहरादून पोलीसांना पत्र लिहून गुप्ता बंधूंपासून धोका असल्याची तक्रार केली होती, असे निरुपम म्हणाले.