शाहू महाराज छत्रपती आता राजकीय झाले!
मुंबई,दि. १६ जुलै ;
एका बाजूला आपण छत्रपतींचा वारसा सांगतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत असेल तर त्याचे संरक्षण करायला जातो हे दुर्दैव आहे. आता शाहू महाराज छत्रपती राजकीय झालेत. त्यांनी राजकीय पांघरूण घातले आहे. सतेज पाटील यांच्या बरोबरीने ते राजकीय उद्देशाने भुमिका घेताना दिसताहेत हे दुर्दैवी असल्याची टीकाही भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
दरेकर म्हणाले की, शाहू महाराज छत्रपती किंवा काँग्रेसला निवडणुकीत एका विशिष्ट समाजाने मतदान केले आहे. त्या समाजाशी इमानदार राहण्याचा ते प्रयत्न करताहेत हे स्पष्ट दिसतेय. एका बाजूला आपण छत्रपतींचा वारसा सांगतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत असेल तर त्याचे आपण संरक्षण करायला जातो हे दुर्दैव आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेली भुमिका योग्य आहे. गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होताच कामा नये. त्याचे समर्थन कुणीच करू शकत नाही. परंतु आता शाहू महाराज छत्रपती राजकीय झालेत. सतेज पाटील यांच्या बरोबरीने ते राजकीय उद्देशाने भुमिका घेताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे.
संभाजीराजेंनी जी भुमिका घेतलीय तिच्याशी सरकारही सहमत आहे. ज्यावेळी प्रतापगडावर अतिक्रमण होते त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी बुलडोजर लावून ते अतिक्रमण निष्काशीत केले. त्यामुळे गडकिल्ले हे सुरक्षित पाहिजेत. तो ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे ही भुमिका सार्वत्रिक महाराष्ट्राची आहे. तीच भुमिका सरकारची आहे. आता शाहू महाराजांनी राजकीय पांघरूण घातल्याने अशा प्रकारची भुमिका येताना दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.
जे बोलतात तेच जातीय तेढ निर्माण करतात. सरकारी पातळीवर एकत्रित बसून त्याचे नियोजन होऊ शकते, दिशा मिळू शकते. परंतु प्रत्येकाला आपली राजकीय पोळी भाजायची आहे त्यातून वातावरण गढूळ होवो नाहीतर जातीय तेढ निर्माण होवो त्याचे दुर्दैवाने विरोधकांना काहीच पडलेले नसल्याचेही दरेकर म्हणाले.
