• Sun. Sep 15th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शने उपयुक्त!

ByXtralarge News

Jul 16, 2024
Visits: 74 Today: 1 Total: 3798080

पंढरपूर, दि. १६ जुलै :

कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरून त्यातून भरघोस उत्पादन शेतकरी घेतात व त्यांची आर्थिक उन्नती घडून येते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अशी नवतंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषी प्रदर्शने उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती व पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरी २०२४’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कृषी सहसंचालक रफीक नायकवडी, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष गायकवाड, उपसभापती राजुबापु गावडे आदी उपस्थित होते.

शेतकरी आपला मायबाप, अन्नदाता, लाखांचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांचे दु:ख व वेदना जाणून घेण्याबरोबरच त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत, या अंतर्गत मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी १५ हजार कोटी रूपयांची मदत देण्यात आली.

मागेल त्याला सौरउर्जा पंप- शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण, ‘एक रुपयात पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत १२ हजार रुपये देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना वीज देयकात माफी, ठिंबक सिंचन, दुधाच्या अनुदानात पाच रुपयांची वाढ, बांबु लागवडी करीता हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान, बेदाणाचा शालेय पोषण आहारात समावेश, दिवसा वीज देण्याचा निर्णय असे विविध लोककल्याणकारी योजनेच्यामाध्यातून सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्याला मदत करण्यात येत आहे. केंद्रशासनाच्या निगडीत प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन मिळून काम करत आहे. या वर्षीचा महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाला आहे.

समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेले विविध निर्णय, योजनांमुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम होते, त्यामुळे सर्व सामान्यापर्यंत या योजना पोहचविण्याचे काम प्रशासनाने अचूकपणे करावे; समाजातील सर्व घटकाला याचा लाभ देण्याबरोबरच एकही पात्र व्यक्ती या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्याच्या विकासाकरीता समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश करुन त्यांना लाभ देण्यात येत आहे. हे सरकार शेतकऱ्याचे, वारकऱ्यांचे कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्व सामान्यांचे आहे. राज्यशासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत महिलांना १ हजार ५०० याप्रमाणे वर्षाला १८ हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १२ वी उत्तीर्ण, पदविकाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे ६ हजार, ८ हजार आणि १० हजार दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार तसेच उद्योजकाला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे शिंदे म्हणाले.

यावेळी माजी आमदार परिचारक यांनी आपले मनोगत व्यकत केले. प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी फिट कापून प्रदेशाचे उद्घाटन केले. त्यानंतर प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या प्रदर्शनात एकूण २०० स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यापैकी शासकीय विभागाचे ५०, महिला बचत गटचे १५ स्टॉल आहेत. इतर महामंडळ, शेतकरी उत्पादक कंपनी, मिलेट उत्पादने, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रीय व औषधी पदार्थ, बियाणे खते औषधे कंपनी, ठिबक व तुषार सिंचन उत्पादक,कृषी यांत्रिकीकरण आणि गृहोपयोगी वस्तुंचे स्टॉल्स आहेत. कृषी पंढरी या प्रदशनाला हजारो शेतकरी, वारकरी व नागरिकांनी भेटी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *