विरोधकांना चारीमुंड्या चीत करुन NCP उभारी घेईल..
अकोले,दि. २० जून –
फळे धरलेल्या झाडावरच दगड जास्त मारले जातात. विरोधकांना आज सर्वाधिक भीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाटत असल्याने त्यांच्या बदनामीची मोहीम विरोधकांकडून राबवली जाते आहे परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अकोले येथे आढावा बैठकीत व्यक्त केला.
राज्यात अजित पवारांचे हात बळकट करावे यासाठी ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात केल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. राज्याचा सामाजिक रचनेचा पाया शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर टिकलेला आहे. मात्र हा सामाजिक रचनेचा पाया दूषित करण्याचे काम विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत केले. याशिवाय अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात विरोधकांना यश आले असेही सुनिल तटकरे म्हणाले.
आदिवासी समाजाचे प्रमाण जास्त असलेल्या या अकोले तालुक्यात सिंचनाच्या माध्यमातून अनेक कामे जलसंपदा मंत्री असताना अजित पवार आणि मी निळवंडे धरणाच्या माध्यमातून या परिसरात झाली असल्याची आठवणही तटकरे यांनी करुन दिली.
अजित पवारांनी जे केले ते चूक हा जो अपप्रचार आणि खलनायक ठरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. याचे भांडवल विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फायदा विरोधकांना झाला नाही. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सहानुभूती आणली त्यात ते काहीप्रमाणात यशस्वीही झाले परंतु ती सहानुभूती आता टिकणार नाही आता अजितपर्व नावाने सहानुभूती निर्माण करायची आहे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.
दिल्लीसमोर अजित पवार झुकले असे चित्र निर्माण केले जातेय परंतु तशी वस्तुस्थिती नाहीय. एनडीएच्या शिर्षस्थ नेत्यांसोबत आपले अजित पवार पहिल्या रांगेत बसले ही आपल्यासाठी आणि पक्षासाठी अभिमानास्पद बाब आहे हे कार्यकर्त्यांनी प्रत्येकवेळी सांगण्याची गरज आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी घेतला. या बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींनी आपले विचार मांडले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अहमदनगर ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर, कृष्णा आढाव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.