मुंबई, ता. २० जून :
काँग्रेसच्या व्होट बँकेवर ठाकरे निवडणूक जिंकले. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली. मात्र काँग्रेसला मतदान करताना ठाकरेंचे हात थरथरले कसे नाहीत. त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे वारस कसे होऊ शकतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन वरळी येथील एनएससीआय डोम येथे दिमाखात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवसेनेचे बालेकिल्ले आपण अबाधित राखले. ठाणे-कल्याण दोन दोन लाखांच्या मताधिक्याने जिंकले, छत्रपती संभाजीनगर जिंकले. आपण घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवला. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि नतमस्तक होतो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपण दोन वर्षापूर्वी उठाव केला. खऱ्याअर्थाने आज निवडणुकीत जनतेने शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. उबाठाला हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. आजच्या मेळाव्यात हिंदु बांधव भगिनी बोलण्याचे धाडस त्यांनी केले नाही. तुमचे कसले हिंदुत्व, अशी टीका करतानाच बाळासाहेबांचे नाव घेण्याचा आणि मते मागण्याचा नैतिक अधिकार उबाठाला राहिला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेबांनी देशभरात नेली. मात्र मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले.
लोकसभेच्या ७ जागा जिंकलो आणखी ३ ते ४ जागा आपण जिंकू शकलो असतो. आपल्याला महायुती अधिक मजबूत करायची आहे. मागचे विसरुन महायुती ताकदीनं आपल्या पुढे न्यायची आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आपल्या साक्षीने ही जबाबदारी मी पार पाडीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या वावटळीत शिवसेनेचा मूळ मतदार शिफ्ट झाला नाही. तो धनुष्यबाणाकडे कायम राहिला. याचे उदाहरण म्हणजे शिवसेनेचे १९ टक्के मूळ मतदार त्यापैकी १४.५% आपल्या बाळासाहेबांच्या विचारांकडे शिवसेनेकडे आली. फक्त ४.५% मतदार तिकडे राहिले आणि इतर मतदार कुठून आले हे सर्वांना माहित अशी टीका त्यांनी केली.
मतदारांनी उबाठाचे दात घशात घातले. हा एकनाथ शिंदे संपणार नाही आणि संपला नाही तर तो जिंकला आणि पुढे जिंकत राहील. शब्दकोषात भिती, डर हा शब्द नाही. कोकणात उबाठा साफ झाला. ठाणे कल्याण पालघर, संभाजीनगर साफ झाला आहे. काँग्रेस ३८८ जागा लढवून फक्त ९९ जागा जिंकले. काठावर देखील पास नाही पण उन्माद करत आहेत. राहुल शेवाळे यांच्या मतदार संघात १% मते आपल्याला आणि ९९% मते त्यांना मिळाली. मग इथ ईव्हीएम हॅक केला असा आम्ही आक्षेप घ्यायचा का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. रविंद्र वायकर यांचा विजय हा जनतेचा विजय आहे मेरिटवर मिळालेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियती कोणाला सोडत नाही आणि कुणालाही माफ करत नाही. उबाठा अतिशय खोटाडरा पक्ष आहे. त्यांना रडे गट असे नाव द्यायला हवे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
आपण १३ जागा समोरा समोर लढलो. आपण ७ जागा जिंकल्या. उबाठा ४२% आणि आपला ४७% स्ट्राईक रेट होता. आपल्या १५ उमेदवारांना ७४ लाख मते मिळाली. ४९३००० सरासरी उबाठाच्या २१ उमेदवारांना सरासरी ४५०००० मते मिळाली. त्यांच्यापेक्षा सरस आपली खरी शिवसेना ठरली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणाची हा निकाल जनतेने दिला आहे. यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता. राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेचे २२०० सरपंच निवडून आल्या होता. वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आपला आहे.
मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा सव्वा दोन लाख मते आपल्याला जास्त मिळाली. उबाठाच्या निवडणुकीत पाकिस्तानी झेंडे फडकत होते. भगव्या झेंड्यावर हिरवे झेंडे नाचत होते. मतांची किती लाचारी कराल. मतांसाठी तुम्ही याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलिसांच्या बलिदानावर तुम्ही संशय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांना ज्याने हाल हाल करुन मारले त्या औरंगजेबाची वाहवा करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. किमान बाळासाहेबांचा तरी विचार करायचा होता.
वरळीत कोणाला किती मते मिळाली हे जगजाहीर आहे. किमान ५० हजारांचा लीड घेऊ अन्यथा राजीनामा देऊ, अशी घोषणा करणारे आता कुठे गेले. येत्या निवडणुकीत तुम्हाला भेंडीबाजार सारखा मतदार संघ शोधावा लागेल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मतदार संघात नाही पत आणि माझ नाव गणपत अशी अवस्था झाली आहे. बाळासाहेब म्हणायचे हिंदूच हिंदूचे शत्रू ठरतील, यापुढे हे होऊ नये, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात बाळासाहेब कधीही नव्हेत आणि आम्ही देखील नाही. शिवसेनेत अनेक कार्यकर्ते अल्पसंख्याक समाजाचे आहेत. बाळासाहेबांचा तुष्टीकरणाला विरोध होतो. देशभक्त मुलसमानांच्या विरोधात बाळासाहेब होते. उबाठा चायनीज छत्रीसारखी आहे. तिची काही गॅरंटी नाही. सत्तेसाठी ते काहीपण करतात. आज मोदींच्या विरोधात त्यांच्या वृत्तपत्रात महाराष्ट्र गद्दारमुक्त करणार अशी हेडलाईन होती, तो आम्ही दोन वर्षांपूर्वीच केलाय.
वारकऱ्यांसाठी विमा दिला. राज्यात आरोग्य अभियान, गाव तिथे शाखा, शिवसंपर्क अभियान सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वर्क फ्रॉम नको. त्याऐवजी नेता आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो,असे मुख्यमंत्री म्हणाले.
खोटे बोला रेटून बोला याचे खंडन केले पाहिजे. गोबेल्सचे बाप रोज सकाळी उठून खोटं बोलतात. हे खोडून लोकांना वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. शिवसेना मजबूत करण्याचा, शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचे विचार जपण्याचा, हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे. आपला निर्धार आहे विधानभवनावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा, या विजयासाठी आजपासून कामाला लागूया, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ग्रामसभा ते विधानसभा या निर्धाराने प्रत्येकाने कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, गरिब दलितांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले. खोटे नॅरेटिव्ह पुसून काढण्यात आपण कमी पडलो. मात्र खोट्या नरेटिव्हमधून निवडणुका एकदाच जिंकता येतात. भूल जशी उतरते तशी दिशाभूल उतरायला वेळ लागणार नाही.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी २५० कोटींचा निधी दिला. कधी जातपात, धर्म बघितली नाही. सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. मराठा समाजाला १०% आरक्षण दिले. जस्टीस शिंदे कमिटी गठित करुन कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण दिले आहे. जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांपासून मराठा आणि ओबीसी समाजाने सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.