मुंबई, दि. १० जून :
INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले, त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी सर्वांत आधी राज्यघटनेची पायमल्ली केली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 1 आणि 2 जेव्हा संविधानात सुधारणा करत होते, तेव्हा यांनी त्यावर मौन बाळगले होते आणि मवाळ हिंदुत्वाचे पांघरुन घेतले होते. या पक्षांना बहुजनांच्या मतांचा वापर करून आपला वाडा वाचवायचा होता आणि तो नव्याने बांधायचा होता आणि ते त्यांनी केले असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, या निवडणूक प्रक्रियेत, बहुजनांनी स्वत:चे स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभे करण्याची आणि त्यांना संसदेत पाठवण्याची संधी गमावली आहे. आमचा लढा नेहमीच संविधान वाचविण्यासाठी राहिला आहे. किंबहुना हेच आमचे तत्वज्ञान आणि विचारधारा आहे.बहुजन मतदारांना हे किती वेळा मूर्ख बनवणार? खरंच यांनी बहुजन मतदारांना मूर्ख बनवून धोका दिला नाही का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. जर या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. तसेच, बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापनाच केली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या ताकदीचा स्त्रोत जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम आहे. वंचितांच्या न्याय हक्काचा आणि संविधान रक्षणाचा आमचा लढा सुरूच राहणार आहे. आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने जनतेच्या पाठिंब्यावर भरारी घेऊ, पुनरागमन करू, असा विश्वास त्यांनी या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.