पांडुरंगाचा सेवक म्हणून वारकऱ्यांची सेवा करेन.
मुंबई, दि. १ जून :
जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशकोत्तर अमृतमहोत्सवी 375 वा वैकुंठगमन सोहळा सप्ताह निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड येथील हजारो वारकरी बांधवांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. ह.भ.प. ज्ञानेश्वर कदम महाराज यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार होते. परंतु नियोजित दौऱ्यामुळे येणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री यांनी दूरध्वनीवरून समारोपाच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीपूर्वी एस.टी.बसेस, पाणी,स्वछता, आरोग्य आदी नियोजन व्यवस्थेचा पंढरपूरात जाऊन आपण स्वतः आढावा घेणार असून वारकरी बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावर्षीच्या आषाढी वारीचे नियोजन मागील वर्षीप्रमाणेच “निर्मल वारी,आरोग्यमय वारी” अशा स्वरुपाचे व सर्वसुविधायुक्त करणार असल्याची शब्द तसेच “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती ” या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे वृक्षांविषयीचे महत्व समाजाला पटवून देत, त्याविषयीची जनजागृती देखील यावेळी वारीमध्ये केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ही सर्व सेवा करताना मुख्यमंत्री म्हणून नाही तर पांडुरंगाचा सेवक म्हणून ही सेवा करणार असल्याचा भाव मुख्यमंत्री यांनी बोलून दाखविला.
कोणत्याही राजसत्तेला धर्मसत्तेचा आशिर्वाद हा असावाच लागतो आणि याचसाठी तुम्हा संतमंडळींचे धार्मिक, अध्यात्मिक अधिष्ठान खूप मोलाची भूमिका निभावत असल्याचे देखील शिंदेंनी आवर्जून सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये वारकरी संप्रदायाच्या आशिर्वादाचा, सहकार्याचा आणि समन्वयाचा महत्वपूर्ण वाटा आहे. पंढरपूर मंदिर आणि परिसर विकास आराखडा तयार करुन यासंदर्भातील कामे देखील अगदी प्रगतीपथावर आहेत. पालखी मार्गांची कामे देखील दर्जेदार झाली आहेत. चंद्रभागा घाटाचे काम देखील पूर्णत्वाचे स्वरुप धारण करत आहे. महाराष्ट्रातील अनेक धार्मिक गडांच्या, तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यासोबतच वारीमध्ये लाखो भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबीरांचे नियोजन मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात येणार आहे. अशी एक ना अनेक वारकऱ्यांशी निगडीत असणारी कामे महाराष्ट्र शासनाने पांडुरंग परमात्म्याचरणी सेवावृत्तीने समर्पित केली आहेत.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आधार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे या संप्रदायाचे पाया आहेत तर जगद्गुरु संत तुकोबाराय हे कळस ! महाराष्ट्रातील सर्वच संतमंडळींनी मानवाला जीवन जगण्यासाठी दिलेला व्यापक दृष्टीकोन अनेक मोठमोठ्या समस्येवरील उपाय ठरतो आहे. ४५०० अभंगांचे लिखाण करत समाजाला उपदेश करणाऱ्या जगद्गुरु संत तुकोबारायांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आणि यानिमित्ताने सासवड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे निमित्त साधून भरलेला वैष्णवांचा मेळा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे वैभव प्रतिबींबीत करणारा होता.
