• Wed. Apr 30th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 156 Today: 1 Total: 4222144

मुंबई, दि. १८ मे :

पैसे वाटणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले जाते आणि शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला जातो, महिलांना मारहाण केली जाते. त्या पोलिसांची नावे मला पाहिजेत. हे सरकार लवकरच जाणार असून उद्या तुमचे काय करायचे हा निर्णय घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही. आमच्याशी मस्तीत वागाल तर मस्ती कशी जीरवायची हे शिवसैनिकांना चांगले माहित आहे. असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ही प्रचाराची सभा नसून ही विजयाची सभा आहे. आता आपल्या अच्छे दिनची सुरवात चार जून पासून होणार आहे. आतापर्यंत या सत्ताधा-यांनी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्या व्यक्तीला बदनाम करायचे. त्यानंतर आपल्या पक्षात घ्यायचे. मग त्याचा सन्मान करायचा असेच आतापर्यत भाजप करीत आला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे यांना बघवत नाही म्हणुन हे महाराष्ट्राला बदनाम करतात, लुटालुट करतात. त्यांना सगळे काही गुजरातला घेऊन जायाचे आहे, मात्र आपले सरकार ही लुट थांबविणार आहे. महाराष्ट्राचे वैभव परत मिळवुन देणार आहे. जे घेऊन गेले आहे त्यापेक्षा कित्येक पटीने परत घेऊन येऊ असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

पंतप्रधान मुंबईत अशा मुख्यमंत्र्यांचा प्रचार करीत आहे जे घटनाबाह्य पद आहे. अजुनही न्यायालयात हे प्रकरण चालू आहे. ते पूढे म्हणाले भाजपचे अध्यक्ष नड्डा म्हणाले की देशात एकच पक्ष राहणार असून भाजप हा आता स्वयंपुर्ण पक्ष झाला आहे. त्यांना आता आरएसएसची गरज नाही. त्यामुळे आरएसएसला शंभरवे वर्ष धोक्याचे असणार हे नक्की झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदी शहा सारखे लोक संघाला नष्ट करुन टाकतील. ज्यांनी जन्माला घातले आहे त्यांनाच संपवायला ते निघाले आहे.

निवडणूक काळात अनेक ठिकाणी पैशांचे वाटप करण्याच्या तक्रारी येत असून याबाबत निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. ज्या वस्त्यांमधून भाजपला मतदान कमी होणार आहे त्या ठिकाणी भाजपचे लोक मतदारांना भेटून त्यांच्या बोटाला शाई लावत आहे. मग ही शाही बाहेर आली कशी असा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे शिवसैनिकांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले.

मोदी हे सध्या भरकटले असून ते कधी काय बोलतात त्यांचे त्यांनाच कळत नाही. कधी ते शिवसेनेला नकली म्हणतात तर कधी काय. उलट त्यांचाच जाहिरनामा हा खाऊवादी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांनी मुंबई महाराष्ट्राला लुटले आहे त्यांना तडीपार करू. फडणवीस देशद्रोही असून त्यांनीच सर्व उद्योग गुजरातला नेले आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला शाह, मोदी, अदानीचे होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *